पती पत्नी आणि ती! ती कोण? | Marathi Story | Marathi Katha | Marathi Goshti

पती पत्नी आणि ती! ती कोण? | Marathi Story | Marathi Katha | Marathi Goshti

marathi katha

माझे नाव अंजली आहे. रवी आणि मी एक वर्ष डेटिंग केल्यानंतर लग्न केले. लग्नाला आमचे काही खास मित्र आणि फक्त जवळचे नातेवाईक आले होते. रवीलाही तेच हवे होते. लग्न शॉर्ट आणि सिम्पल व्हावे अशी त्याची इच्छा होती. आम्ही इथे पुण्यात राहतो, तर रवीचे आई-वडील गावीच असतात. रवी त्याच्या आईबाबांचा एकुलता एक मुलगा आहे. रवी फारसा कधी गावी जात नाही. जेव्हा कधी त्याच्या आई बाबांना आम्हाला भेटायचे असते, तेव्हा ते इथे पुण्यातच येतात. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडून हाऊसवाईफ बनले आहे आणि घराकडे पूर्ण लक्ष देत आहे.

आम्ही नुकतेच येथे एक छोटेसे घर देखील घेतले आहे. आमचे घर रस्त्याच्या कडेला आहे. खिडक्यांमधून रस्ता दिसतो. आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतूनही रस्ता दिसतो. रवीची ऑफिसची वेळ सकाळी ९ आहे. त्यामुळे त्याला मी सकाळी लवकर ऑफिसचा टिफिन बनवुन देते. सकाळी सकाळी स्वयंपाक करत खिडकीच्या बाहेरची वर्दळ बघणे हा आता माझा नेहमीचाच छंद झाला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून आमच्या खिडकीच्या बाहेरच्या रस्त्याच्या पलीकडे साधारण तिशीची एक मुलगी मला दिसते आहे. छान, गोरीपान, सुंदर. ती रस्त्यापलीकडे उभी राहून सारखी आमच्या घराकडे पाहत बसते. पहिल्यांदा मला वाटले कि उभी असेल कुणाची तरी वाट बघत! म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण परत तेच तेच होऊ लागले. मग मला वाटले की तिच्याशी जाऊन बोलावे, कदाचित ती आमच्या घराला दुसऱ्याचे घर समजत असेल.

मी रवीला सांगायला गेले, तर तो झोपला होता. मग त्याला न उठवता, मी खाली गेले आणि रस्त्यापलीकडे त्या मुलीच्या थेट समोर जाऊन उभी राहिले. तिला विचारले,”ताई,कोण तुम्ही? तुम्हाला काही मदत हवी आहे का? तुम्ही आमच्या घराकडे पाहून कुणाला शोधता आहात?” यावर ती घाबरून म्हणाली,”रवी इथेच राहतो का?” मी म्हणाले,”हो. पण तुम्हाला कसे माहीत? तुम्ही त्याला ओळखता का?” हे ऐकून ती घाबरली आणि घाईघाईत तिथुन निघून जाऊ लागली. मी तिला मागून हाक मारत राहिले. पण मागेदेखील वळून न बघता ती तिथून निघून गेली.

मी घरी परत आल्यावर रवी जागा झाला होता. मी कुठे गेले होते असे त्याने विचारले. मी त्याला झाला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून रवीचा चेहरा फिका पडला. मी त्याला हेही सांगितले कि तिलाही तुझे नाव माहीत होते. “कोण होती रे ती रवी? ती तुला कशी ओळखते?” हे ऐकून रवीला राग आला. तो म्हणाला,”अगं वेडी आहेस का तू? मला कसं माहीत असेल?” पण रवीच्या चेहऱ्यावरचा बदललेला रंग पाहून मला आश्चर्य वाटले. पण ह्या विषयाला जास्त हवा न देता तो विषय आम्ही तिथेच थांबवला.

परत रात्रीपर्यंत आम्ही याच्यावर काही बोललो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, तेव्हा रवी आधीच उठून मला न सांगताच कुठेतरी बाहेर गेला होता. किचनमध्ये गेल्यावर बघितले तर रवीने किचनची खिडकी घट्ट बंद करून ठेवली होती. कशाला लावली रवीने ही खिडकी? असा विचार करत खूप प्रयत्न करून मी किचनची खिडकी उघडली. खिडकी उघडली, तशी आपसूकच माझी नजर खाली रस्त्यावर गेली. रस्त्यापलीकडे रवीला त्या कालच्याच मुलीशी बोलताना पाहून मला आश्चर्य वाटले.

ही कथा आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.

तो त्या मुलीवर रागवत होता आणि तिच्याशी ओरडून बोलत होता. ती मुलगी बिचारी रडत रडत हात जोडून काहीतरी सांगत होती. पण रवीने रागावत तिला बोट दाखवून निघून जायला सांगितले. काय चालले होते ते मला समजत नव्हते. शेवटी वैतागून मी खिडकी बंद केली. थोड्यावेळाने रवी घरी आला. मी त्याला विचारले,”कुठे गेला होतास रवी?” “हे काय खालीच गेलो होतो ब्रेड आणायला.” हातातील ब्रेडचा पुडा टेबलावर ठेवत रवी म्हणाला. जणू काही झालेच नाही असे रवी वागत होता. त्याने खाली झालेला प्रकार मला अजिबात सांगितला नाही. मीही त्याला काही बोलले नाही.

पण आता माझ्या मनात चित्रविचित्र विचार येऊ लागले. आणि ते साहजिकच होतं. रवी माझ्यापासून काय लपवत आहे? रवीशी लग्न करण्यात माझी काही चूक तर नाही झाली ना? कोण होती ती मुलगी? रवीची एक्स गर्लफ्रेंड तर नसेल? रवीने फसवले आहे का तिला? कालपर्यंत मला त्या मुलीचा राग येत होता. पण आता तिची दया येऊ लागली होती. मला सकाळच्या प्रकाराबद्दल रवीला जाब विचारावासा वाटला. पण तो खोटं बोलणार हे मला माहीत होतं. या सगळ्याचा विचार करता करता माझी तब्येत ढासळली.

संध्याकाळपर्यंत मला सणकून ताप आला. संध्याकाळी रवी घरी परत आला, तेव्हा त्याने मला पटकन तापाचे औषध दिले. पण मी ते घेतले नाही. मला रवीची कुठचीच गोष्ट आता ऐकावीशी वाटत नव्हती. शेवटी ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून रात्री मी चक्कर येऊन खाली पडले. रवीने मला पटकन गाडीत घालून जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेले. तिथे गेल्यावर मी शुद्धीवर आले. डॉक्टरांनी मला ऍडमिट करायची गरज नाही असे सांगून औषध लिहून दिले. रवी औषधे आणायला केमिस्टकडे गेला आणि मी हॉस्पिटलच्या पार्कमध्ये बसले होते.

त्याचवेळी ती मुलगी मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दिसली. तिला पाहताच मी पटकन तिच्याकडे गेले आणि तिचा हात धरला. तिला वैतागून विचारले,”कोण आहेस तू जिने गेल्या दोन-तीन दिवसात माझ्या आयुष्यात अशी प्रचंड उलथापालथ निर्माण केली आहेस? सकाळी तू रवीशी काय बोलत होतीस? तुझा आणि त्याचा काय संबंध?” मग त्या मुलीने मला तिची आणि रवीची पूर्ण हकीकत सांगितली. मला धक्काच बसला. रवी इतक्या उलट्या काळजाचा का बरे निघाला? एवढी मोठी गोष्ट त्याने माझ्यापासून लपवून ठेवली.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्या मुलीला घरी बोलावले. संध्याकाळी रवी घरी आला असता आपल्या घरात त्या मुलीला पाहून चपापला. तिच्या अंगावर ओरडलं,”रेवा, तू इथे कशी? चालती हो आधी!! तुला सांगितले होते ना अंजली पासून दूर रहा म्हणून? तरी तू का आलीस इथे?” “मी आणलाय रेवा वन्सना इथे!! त्यांना काहीही वाईट-साईट बोलण्याचा अधिकार तुला नाहीये रवी!” मी रवीला म्हणाले. रवी एकदम चकित होऊन माझ्याकडे बघतच बसला. मी म्हणाले,”हो रवी! मला सगळे माहित पडले आहे. किती कठोर आहेस तू! लाज वाटते मला तुझी! रेवा ताई तुझी सख्खी बहीण असूनदेखील तुला तिच्याबद्दल जरादेखील माया नाहीये का?”

खरंतर रेवा ही रवीची सख्खी बहीण होती. दोन वर्षांपूर्वी तिने पळून जाऊन लग्न केले होते. तेव्हापासून रवी आणि त्याच्या आईबाबांनी रेवाशी सगळे संबंध तोडून टाकले होते. इतकेच नव्हे तर मलादेखील तिच्याबद्दल काही सांगितले नव्हते. काल मला रेवा ताई हॉस्पिटलमध्ये दिसली तेव्हा तिने मला सगळी हकीकत सांगितली. आता रेवाताईचा नवरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. त्याचे हार्टचे ऑपरेशन होते आणि त्यासाठी तिला ५ लाख रुपयांची गरज होती. म्हणून ती रवीला मदतीसाठी भेटली होती. पण रवीने तिला पैसे देण्यास नकार दिला आणि तिला उलट तिथून हाकलून दिले.

रेवा ताईची कहाणी ऐकून मला फार वाईट वाटले. मी रात्रीच ५ लाख रुपये तिच्या अकाउंट मध्ये ट्रान्स्फर केले आणि तिला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी बोलावले. मी रवीला म्हणाले,”इतका कसा रे तू निर्दयी झालास? झाले गेले सगळे विसरून तू रेवा ताईशी समेट का करत नाहीस? अरे कितीही झाली तरी ती तुझी सख्खी बहीण आहे. ज्या माणसाला स्वतःच्या बहिणीचे अश्रू बघून दया येत नाही, त्या माणसात माणुसकीच शिल्लक नाही. मला अगोदर माहित असते की तू इतका कठोर आहेस, तर मी तुझ्याशी कधी लग्नचं केलं नसतं.”

माझे बोलणे ऐकून रवीला वाईट वाटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो ढसाढसा रडू लागला आणि रडत रडत तो म्हणाला,”रेवा ताई मला माफ कर. मी तुझ्याशी असे वागायला नको होते. पण आम्ही तुला खूप लाडाकोडात वाढवले होते. एके दिवशी तू कुणालाही काहीही न सांगता घरातून पळून गेलीस. अगं, तुझे प्रेम होते, तर आम्हाला कमीत कमी विश्वासात घेऊन सांगायचे तरी होते. पण तू पळून गेलीस आणि आम्हाला एकदम आमचा विश्वासघात झाल्यासारखे वाटले. गावात आपल्या कुटुंबाची खूप बदनामी झाली गं. म्हणून आम्ही ठरवले की आता तू आमच्यासाठी मेलीस. पण आता झाले गेले गंगेला मिळाले. मला एकदा माफ करून बघ. मी आईबाबांना पण समजावेन. ही वेळ परत येणार नाही. आमचेही चुकलेच.”

रवीला रडताना पाहून रेवा ताईदेखील रडू लागली. त्या दोघा भाऊ बहिणीला रडताना पाहून माझे डोळेदेखील भरून आले. पण आता त्यांच्यातील सर्व तक्रारी दोघांच्या अश्रूंनी संपल्या होत्या. मग रवी स्वतःच रेवा ताईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. त्याने आई बाबांनाही फोन करून पुण्यात बोलवून घेतले. त्यांना समजावले. दोघांनीही आपल्या मुलीला मोठ्या प्रेमाने मिठी मारली. आता रेवाताईच्या पतींची प्रकृती चांगली आहे. देवाकृपेने आमचे सगळ्यांचे आयुष्य आता सुखी झाले आहे.

समाप्त

मित्रमैत्रिणींनो, आपल्याला ही कथा कशी वाटली? आपला अभिप्राय नक्की कळवा.

Leave a Reply