बहिणीचा नवरा | Emotional Marathi Story

Emotional Marathi Story

Emotional Marathi Story: माझे नाव मधू आहे. माझ्या लहान बहिणीचे नाव मिता आहे. मिता माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान आहे. आम्हा दोघी बहिणींमध्ये खूप प्रेम आहे. आम्हाला दोघींना एकमेकांशिवाय अजिबात चैन पडत नाही. आम्ही जिथे तिथे दोघीही एकत्रच असतो.

आईला नेहमी चिंता वाटायची की लग्न झाल्यावर दोघीही एकमेकांशिवाय कशा राहणार? पण आम्ही तिला नेहमी सांगायचो की तू आमच्यासाठी दोन भावांचे स्थळ बघ. एकाशी मी लग्न करेन आणि एकाशी मिता.

आपलं लग्न एकाच घरात आणि एकत्रच व्हावं, असे आम्हा दोघींनाही वाटे आणि सुदैवाने हेच घडले. आम्हा दोघींचे लग्न एकाच कुटुंबात झाले. रवी माझा नवरा आहे आणि त्याचा छोटा भाऊ राज माझी बहिण मिताचा नवरा आहे. लग्नानंतर आम्ही एकत्र कुटुंबात राहू लागलो. आता आम्ही दोघी बहिणी फार खुश होतो.

रवी आणि राज, आमच्या पतींचेही चांगले बॉन्डिंग आहे. त्या दोघांचे आईबाबा देखील खूप चांगले आहेत. ब्रॉड माईंडेड आहेत. त्यामुळे आम्हा दोघींना सासुरवास असा काही नव्हताच. लग्नानंतर आम्ही दोघीही एकाच वेळी प्रेग्नन्ट झालो. आणि योगायोग असा घडला की आम्हा दोघींनाही एकच डिलिव्हरीची तारीख देण्यात आली.

त्यामुळे सासरची आणि माहेरची सगळीच माणसे फार खुश होती. आम्ही डिलिव्हरीसाठी एकत्रच हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. डिलिव्हरीनंतर मी शुद्धीत आले, तेव्हा मला मुलगा झाल्याचे समजले.

मग मी मिताबद्दल विचारले. तिला मुलगी झाल्याचे कळाले. आम्ही दोघी बहिणी फार आनंदात होतो. आता आम्ही आई झालो होतो, आणि त्याही एकत्रच. आता आम्ही एकत्रच आमच्या मुलांचे संगोपन करू लागलो. माझ्या मुलाचे नाव ठेवले तनिश, तर मिताच्या मुलीचे नाव ठेवले तनिषा. मुले फार लवकर मोठी होतात.

बघता बघता दोन वर्ष कशी निघून गेली कळलेच नाही. माझा मुलगा तनिश जसजसा मोठा होत होता, तसतसा तो माझ्यासारखा किंवा रवीसारखं न दिसता तो माझ्या बहिणीचा नवरा राजसारखा दिसायला लागला होता.

ही Emotional Marathi Story आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.

सुरुवातीला मला वाटले की मला गैरसमज झालाय. पण आता बाहेरचे लोकही म्हणू लागले की, तनिश डिट्टो त्याच्या काकासारखा दिसायला लागलाय म्हणून. मिता आणि राजची मुलगी तनिषा तिच्या बाबांसारखी म्हणजे राजसारखी दिसते. पण तनिश पण राजसारखा का दिसतोय हे एक गूढच होते.

एकदा सहज गंमतीमध्ये में रवीला म्हणाले की तनिश थेट त्याचा काकासारखा दिसायला लागलाय. पण रवी माझ्यावरच वैतागला. “काहीतरीच काय बोलतेय?”तनिश राजसारखा का दिसेल? काय हे खूळ घेतलायस तू डोक्यात?” रवीला इतके माझ्यावर चिडायची काय गरज होती? मी तर माझी शंका बोलून दाखवली होती.

असेच आणखी काही महिने निघून गेले, पण हे सर्व माझ्या मनात घोळत राहिले. मला ही गोष्ट मिताशी बोलायची होती. पण तिला वाईट वाटले तर? हा विचार करून में गप्प बसले. कदाचित माझ्यामुळे तिच्या आणि राजमध्ये काही तणाव निर्माण होऊ शकतो.

तरीही एकदा मी तिला गंमतीने एवढेच म्हणाले की हळूहळू तनिश त्याच्या काकासारखा दिसू लागला आहे. पण हे ऐकताच मिता काही म्हणाली नाही. फक्त गूढपणे हसली. तिचे हे हसू मला माहित होते. तिला कुणापासून काही लपवायचे असेल तर ती अशीच गूढ हसते. मी तिला म्हणाले की काय झालाय? पण ती काहीतरी कामाचे निमित्त करून तिथून निघून गेली.

आता मला शंका येऊ लागली की माझ्यापासून काहीतरी लपवले जात आहे. विचारून तरी कुणाला काय विचारणार? विचार करून करून डोक्याचा भुगा व्हायची वेळ अली. पण उत्तर काही सापडेना. शेवटी वैतागाने कोणाला काही न सांगता, तनिषला घेऊन माझ्या माहेरी निघून गेले.

मला अचानक माहेरी आलेले पाहून आईबाबांना आश्चर्य वाटले. आई म्हणाली,”काय झाले मधू? तू अशी अचानक एकटीच माहेरी आलीस? काय झाले? सासरी काही प्रॉब्लेम झाला का?” मी माझ्या आईला सांगितले,”आई, मला काय होत आहे ते माहित नाही, विचार करून करून मी वेडी झाले आहे, मी काही कदाचित चुकीचा विचार करत असेन. पण मला काही सुचत नाहीये. मी काही दिवस इथेच राहते. कदाचित माझे मन शांत होईल.”

आईने विचारले,”अगं मधू काय झाले बाळा? मला सांग. काही प्रॉब्लेम आले तर आपण नक्कीच काहीतरी मार्ग काढू.” आईचे हे आश्वासक बोलणे ऐकून मी रडू लागले आणि आईला सगळी हकीकत सांगितली.

तितक्यात मिताचा फोन आला. आई तिच्याशी बोलली आणि मला म्हणाली,”बाळा, कदाचित आता तुला सत्य कळण्याची वेळ आली आहे. अन्यथा तुझे अतिविचार करणे, तुला नुकसान करू शकते. तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिता आणि राजकडूनच मिळतील.” मी माझ्या माहेरी थोडे दिवस राहण्यासाठी गेले होते, पण संध्याकाळीच मी माझ्या सासरी परत आले.

मी उत्तर मिळण्यासाठी इतकी अधीर झाले होते की माहेरी राहूच शकले नाही. घरी परत आल्यावर रवी माझ्यावर वैतागला,”अगं, अशी कशी न सांगता तू माहेरी निघून गेलीस? असं न सांगता कुणी जाते का?” पण मी त्याला फक्त इतकेच बोलले की माझ्यासोबत मिताच्या रूममध्ये चल.

तिचा नवरा राजदेखील रूममध्येच होता. पण मला आणि रवीला पाहून त्यांना  आश्चर्य वाटले नाही. जणू दोघे माझीच वाट बघत होते. मी मिताला थेटच विचारले,”मिता, आई काय म्हणत होती? तुला काय माहीत आहे?” मिता म्हणाली,”अगं हो हो… शांत हो ताई! मला वाटते की आता तुला सगळे सांगायची वेळ आली आहे.” न कळून मी फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले.

ती म्हणाली,”ताई, आपण दोघीही एकाच वेळी प्रेग्नन्ट राहिलो. पण माझ्या पोटात जुळी मुलं होती. में आणि राज एकदम एक्ससाईट झालो होतो. पण सगळ्यांना बाळ झाल्यावर सर्प्राईस देऊ म्हणून आम्ही घरात कुणाला सांगितले नाही. आपल्या डिलिव्हरीच्या वेळी तुझ्यात काही कॉम्प्लिकेशन्स झाले आणि तुझं बाळ गेले. तर मला एक मुलगा आणि एक मुलगी झाले. तुझी प्रकृती फार नाजूक होती. तुला जर तुझे बाळ गेले ही गोष्ट सांगितली असती तर तुझ्या जीवाला धोका निर्माण झाला असता. आम्ही विचार केला, की तसाही आम्हाला जुळी बाळं झाली आहेत. एक बाळ, मावशीकडे  वाढले काय किंवा आईकडे वाढले काय? राहणार तर एकाच घरात ना? म्हणून मी आणि राजने आमचा मुलगा तुझ्या ओटीत टाकला. तनिश माझा आणि राजचा मुलगा आहे. ही गोष्ट फक्त तुला सोडून सासरी आणि माहेरी सगळ्यांना माहित आहे. रवी भावोजींनादेखील तुला आनंदी पाहायचे होते, म्हणून तेही गप्प राहिले.”

मिताने एका दमात मला सगळे सांगून टाकले. हे सारे ऐकून क्षणभर मी सुन्नच झाले. दुसऱ्याच क्षणी मी जाऊन मिताला मिठी मारली आणि रडू लागले. “मितू, किती मोठं मन आहे गं तुझं आणि राज भावोजींचं? तूम्ही तुमच्या पोटाच्या गोळ्याला एका क्षणाचाही विचार न करता माझ्या पदरात टाकलं. तुझ्या जागी मी असते तर कदाचित मी असे करू शकले नसते.”

असा परिवार आणि इतके सुपाएव्हढे काळीज असणारी बहीण मिळाली तर अजून काय पाहिजे आयुष्यात? तिने माझ्यावर केलेले उपकार मी या जन्मी तरी फेडू शकत नाही. तनिश आता माझा मुलगा आहे आणि त्याला आयुष्यभर भरभरून प्रेम देण्याचा प्रयत्न करेन.

समाप्त

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top