डोरबेलचा आवाज ऐकून राजूने दार उघडले. दारात एक बाई उभी होती. त्या बाईने सांगितले की तिला मिहीरला भेटायचे आहे. त्या बाईला दारातच थांबवून राजू मिहीरला सांगण्यासाठी गेला.
“सर, एक मॅडम आल्यात. तुम्हाला भेटायचे आहे,” राजू मिहीरला म्हणाला.
“कोण आहे?” मिहीरने विचारले.
“मला माहीत नाही सर, पण कुणीतरी चांगल्या घरच्या वाटतायत.” राजूने उत्तर दिले.
“ठीक आहे. बोलाव त्यांना आत.” मिहीर म्हणाला.
राजूने त्या बाईला आत बोलावले आणि मिहीरने तिला बघताच आश्चर्याने म्हटले, “अरे शनाया, तू? व्हॉट या प्लेझंट सरप्राईझ! कशी आहेस? आणि इथे कशी? ये ये बस ना!” सोफ्यावर बसताना शनाया म्हणाली, “अरे हो हो! किती प्रश्न विचारशील? इतके दिवस या शहरात राहूनही तूला माझी आठवण आली नाही. तू काही मला भेटायला आला नाहीस. म्हणून मीच आले भेटायला तुला.
“अगं शनाया, तसं नाहीये. वास्तविक, मी १५ दिवसांपूर्वीच मुंबईला आलो आहे. ऑफिसच्या कामातून फुरसतच मिळत नाही. अद्याप मी हे शहर नीट पाहिलंही नाही. पण मला सांग. माझी इथे आल्याची माहिती तुला कशी मिळाली?” मिहीरने शनायाला विचारले.
“माझा माझा नवरा अपूर्व तुझ्याच ऑफिसमध्ये काम करतो. त्याने सांगितले कि कुणी मिहीर पाटील बंगलोरहून इथे मुंबईत शिफ्ट झाला आहे आणि ऑफिसच्या फ्लॅटमध्ये राहातो आहे. त्याच्या फेसबूकमधे बघितले तर तुझाच फोटो. मग आले पटकन तुला भेटायला.” शनाया हसत म्हणाली.
“अच्छा, अपूर्व तुझा नवरा आहे तर! मी त्याला चांगलेच ओळखतो. तो माझ्याच डिपार्टमेंटला आहे.” मिहीर म्हणाला. थोड्या वेळ त्या दोघांनी भरपूर गप्पा मारल्या. नंतर मिहीरची ऑफिसला जायची वेळ झाली होती, त्यामुळे शनाया तिथून निघाली.
जाताजाता तिनेही मिहीरला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. संध्याकाळी ऑफिसच्या कामातून मोकळा झाल्यावर मिहीर घरी आरामात बसला होता. अचानक त्याला शनायाची आठवण आली.
५ वर्षांपूर्वी त्याने इंजिनीअरिंगची परीक्षा दिली होती आणि जॉब शोधण्यासाठी तो त्याच्या बहिणीच्या घरी पुण्याला आला होता. शनाया ही त्याच्या बहिणीच्या शेजारी राहात होती आणि त्याच्या बहिणीची मैत्रीण होती. त्यामुळे दिवसातून दोन-तीनदा तिची घरात चक्कर असे.
त्यावेळी मिहीर २२ वर्षांचा तर ती साधारण १८ वर्षांची होती. तिला अभ्यासात फारशी रुची नव्हती. तिने जेमतेम काठावर १०वी पास केली होती. त्यानंतर तिने तिचे शिक्षण थांबवले होते. शनाया दिसायला फार सुंदर होती. आणि अभ्यासापेक्षा ती स्वतःवर आणि नटण्यामुरडण्यावर जास्त लक्ष देत असे.
बहिणीच्या घरात ती, तिचा नवरा, सासू आणि आता मिहीर असे एकूण ४ लोक राहात होते. मिहीरचे जीजू दिवसभर ऑफिसमध्ये असायचे. बहिणीची म्हातारी सासू घरात होती. म्हातारपणामुळे त्यांचे शरीर अशक्त होते, परंतु त्यांचे डोळे फारच तीक्ष्ण होते.
ही Marathi Emotional Story आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.
मिहीर जवळपास २ महिने बहिणीच्या घरी राहिला. त्याची खोली वरच्या मजल्यावर गच्चीशेजारीच होती. शनाया त्यांच्या घरी आली कि गच्चीवर जायच्या बहाण्याने मिहीरच्या खोलीत हमखास डोकवायची. त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करायची.
अल्लड वयामुळे हळूहळू मिहीरलाही ती आवडू लागली. तिच्याबद्दल एकप्रकारचे आकर्षण वाटू लागले. ते तासंतास गप्पा मारत बसायचे. शनायाला महागडे दागिने, साड्या, चांगलं घर आणि ऍडवान्सड गॅजेट्सची फार हौस होती. ती तसे बोलूनही दाखवी. आणि ‘मी एखादा चांगला श्रीमंत मुलगा बघूनच त्याच्याशी लग्न करेन.’ असे बोलूनही दाखवी.
पण तारुण्यसुलभ आकर्षणापायी मिहीरलाही त्यात काही वावगे वाटत नसे. तो शानयाच्या फार जवळ येऊ लागला होता. तिच्या या साऱ्या इच्छा आपण पूर्ण करूयात असे त्याला मनोमन वाटू लागले होते. शनायाही मिहीरच्या जवळ येत होती. ती मिहीरवर मनापासून प्रेम करू लागली होती.
पण बहिणीच्या सासूबाईंना त्या दोघांची अवस्था समजली आणि एके दिवशी तिने मिहीरच्या बहिणीसमोरच त्याला सरळ सांगितले. म्हणाली, ‘मिहीर तू करिअर करण्याच्या वयाचा आहेस. भावनेच्या भरात स्वतःच्या आयुष्याशी, करीयरशी खेळणे चांगले नाही. हे प्रेम नाही, तर दोन क्षणाचे आकर्षण आहे. आणि ती मुलगी तुझ्यासाठी चांगली नाही.”
त्यांचे बोलणे ऐकून मिहीरला अपराधी वाटले. उगीच माझ्या बेजवाबदार वागण्यामुळे माझी ताई अडचणीत सापडायला नको असे त्याला वाटले. दुसऱ्या दिवशीच तो बहिणीच्या घरून गावी परतला. थोड्या महिन्यांनी त्याला बंगलोरमध्ये जॉब लागला. दरम्यान शनायाचेही लग्न ठरले. त्याचे त्याला रीतसर आमंत्रणही आले.
पण बंगलोरला जायच्या गडबडीत असल्यामुळे तो काही लग्नाला जाऊ शकला नाही. मिहीर शनायाला केव्हाच विसरला होता. तसेही त्यांच्यात काही ऑफिशियल नाते नव्हतेच. अशीच तीन वर्ष निघून गेली.
मिहीरचे एका चांगल्या उच्चशिक्षित मुलीशी लग्न झाले. तीदेखील बंगलोरमध्ये जॉब करत होती. ऑफिसच्या कामानिमित्त ती बऱ्याचदा बाहेरगावी असे. त्यांच्याही लग्नाला आता दोन वर्ष झाली होती. आणि आज अचानक अशी शनाया त्याच्यासमोर आली होती.
मिहीर आता त्याच्या ऑफिसच्या कामात बराच बिझी झाला होता. पण ऑफिसनंतर काय करायचे हा प्रश्न त्याला होता. बायकोही तिथे बंगलोरला असल्याने घरी त्याला एकट्याला फार कंटाळा येई. त्याच्या भिडस्त स्वभावामुळे इच्छा असूनही त्याला शनायाच्या घरी जाता आले नाही. दरम्यान शनाया आता रोज मिहीरच्या घरी जाऊ लागली.
बऱ्याचदा ती मिहीरकडे जाताना त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून नेऊ लागली. हळूहळू शनाया मिहीरसोबत शॉपिंग करायला जायला लागली. एके दिवशी शनाया मिहीरला सोबत घेऊन साडीच्या दुकानात गेली. म्हणाली, “मिहीर, अपूर्वच्या मामाच्या मुलीचे लग्न आहे. लग्नात घालण्यासाठी माझ्याकडे कोणतीच साडी नाही, म्हणूनच मला नवीन साड्या घ्यायच्या आहेत.”
मग तिच्या आवडीनुसार तिने ३ साड्या पॅक करून काउंटरवर आल्या, साड्यांचे बिल घेतले आणि मिहीरला दिले आणि म्हणाली, “तू आता पैसे दे, मी तुला नंतर पैसे देते.” जवळपास २५ हजार रुपयांचे बिल होते.
त्याने बिल पे केलं आणि तो शनायासोबत गाडीत बसला. गाडी थोड्या अंतरावर गेली तेव्हा शनाया त्याला म्हणाली,”माझ्या लग्नात आईने मला जो हार करून दिला होता तो आता तुटला आहे. मला लग्नात घालण्यासाठी एक छानसा हार घ्यायचा आहे, पण मी काय करू? पैशाची एवढी कमतरता आहे की मी इच्छा असूनही काही करू शकत नाही.
मला वाटले होते कि चांगल्या श्रीमंत मुलाशी लग्न करेन, पण हाय रे कर्मा! अपूर्व श्रीमंत असूनही कंजूस आहे. त्याला माझे दागिने, साड्यांवर पैसे खर्च करणे म्हणजे उधळपट्टी वाटते. तो मला गरजेपुरतीच पैसे देतो. तू आता मला हार घेऊन देशील का? नंतर मी तुला हाराचे पण पैसे परत करीन.” मिहीर शांतपणे शनायाचे बोलणे ऐकत गाडी चालवत होता.
त्याला शांत पाहून शनायाने विचारले, “मिहीर, काय झाले? चलतोयस ना तू ज्वेलर्सच्या दुकानात?” “तू म्हणत असशील तर जाऊया.” मिहीर इच्छा नसतानाही म्हणाला. ज्वेलर्सच्या दुकानात शनायाला दीड लाखाचा नेकलेस आवडला. मिहीरने काहीशा नाराजीनेच बिल भरले. पण शनायाला त्याची पर्वा नव्हती. त्यानंतर दोघेही आपापल्या घरी परत गेले.
दुसऱ्या दिवशी शनाया आणि अपूर्व लग्नासाठी एका आठवड्यासाठी त्यांच्या गावी निघून गेले. मिहीरचेही रुटीन चालूच होते. आठवड्याभरानंतर शनाया लग्नानंतर परतली आणि मिहीरला भेटायला आली. ती आली तेव्हा तिने सुंदरशी साडी नेसली होती. साडीला मॅचिंग असा फॅन्सी ब्लाउज घातला होता. तिने तिचे लांब केस अतिशय व्यवस्थित स्टाईल केले होते. तिच्या ओठांवरची लिपस्टिक आणि कपाळावरची बिंदी यामुळे तिचा लुक खूपच वाढला होता. तिने भरभरून परफ्यूम लावला होता.
शनायाने खूप वेळ वेषभूषा करण्यात घालवल्याचं दिसत होतं. शनाया आली आणि तिने मिहीरला चित्रपटाची दोन तिकिटे दिली आणि म्हणाली, “मिहीर, गावी काही काम असल्यामुळे अपूर्व दोन दिवसांनंतर येणार आहे. त्यामुळे परवापर्यंत मी एकटी आहे. मला एकटीला कंटाळा आला आहे. म्हणून तुला आज माझ्यासोबत चित्रपट पाहायला यावे लागेल. कोणताही बहाणा एक्सेप्ट केला जाणार नाही.”
मिहीर शनायाचे शब्द टाळू शकला नाही आणि तिच्यासोबत चित्रपट पाहायला गेला. चित्रपट पाहताना, शनाया मधूनच मिहीरला एकदम लगटून बसली. त्यामुळे तो अगदी अवघडून गेला होता. पण तिला पटकन तोडून बोलणे त्याला जमले नाही. चित्रपट संपल्यावर ते दोघे हॉटेलमध्ये गेले आणि एकत्र डिनर केले.
डिनरनंतर मिहीर जेव्हा तिला आपल्या गाडीने घरी सोडायला जाऊ लागला तेव्हा ती म्हणाली,”अरे देवा! मी घराच्या चाव्याच आणायला विसरले.” “अरे बाप रे! आता मग?” मिहीर घाबरून म्हणाला. “आता एव्हढ्या रात्री मी कुठे चावीवाला शोधत फिरू? त्यापेक्षा मी असं करते कि आज रात्री तुझ्याच घरी येते. सकाळी निवांत चावीवाल्याकडून चावी बनवून मग घरी जाईन.”
मिहीरकडे आता हो म्हणण्याखेरीज कोणताच ऑपशन नव्हता. त्याने नाराजीनेच गाडी घराकडे वळवली. ते लोक घरी पोचले तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते. मिहीरने आपली बेडरूम शनायासाठी रिकामी केली आणि स्वतः ड्रॉईंग रूममध्ये झोपायला गेला. तो खूप थकला होता, त्यामुळे सोफ्यावर पडताच त्याला गाढ झोप लागली.
अचानक अर्ध्या रात्री मिहीरला त्याच्या अंगावर कसलेतरी ओझे जाणवले. त्यापाठोपाठ नाकात शानयाच्या परफ्युमचा सुगंध जाणवला. शनाया त्याच्या अंगावर झुकत असल्याचे त्याने पाहिले. तिला ढकलून देऊन तो ताडकन उठला. “अगं काय करतेस? लग्न झालेली बाई तू! तुला काही लाज शरम आहे की नाही? हे काय चालाय?” मिहीरने रागाने विचारले.
त्याने पाहिले की शनाया खूप उत्तेजित झाली होती आणि मादक डोळ्यांनी त्याच्याकडे पहात होती. अस्वस्थ अवस्थेत शनाया तिचे दोन्ही हात पसरून म्हणाली, “मिहीर, मला निराश करू नकोस, आपल्याला ही संधी खूप वर्षांनी मिळाली आहे. प्लीज माझ्याकडे ये.”
पण मिहीर वैतागून म्हणाला, “शनाया तुला लाज वाटायला हवी. अगं सोन्यासारखा नवरा आहे तुझा! त्याला फसवताना तुला काही वाटत नाहीये? एक स्त्री आपल्या पतीशी नेहमीच एकनिष्ठ असते. अगं जरा भानावर ये. अपूर्व बिचारा किती साधाभोळा आहे. त्याला समजले की आपली बायको अशी व्यभिचारी आहे, तर जीव देईल ग तो. आणि तुला कसे वाटले कि मी पण तुझ्यासोबत असला घाणेरडा प्रकार करेन? माझ्यावर फक्त आणि फक्त माझ्या बायकोलाच अधिकार आहे हे लक्षात ठेव. मी तिचा कधीही विश्वासघात करणार नाही.” मिहीर आता रागाने थरथरू लागला होता. “शनाया, शुद्धीवर ये. ऐक, एकदा बाई व्यभिचारिणी बनली की तिचा नाश निश्चित आहे. तू उद्या सकाळ होताच निघून जा.”
त्याचे बोलणे ऐकून शनाया आता क्रुद्ध झाली होती. “तुझी ही हिम्मत कि तू मला नाही म्हणशील? मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन कि तू माझ्यावर आता अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. कोण विश्वास ठेवेल तुझ्यावर?”
“नाही शनाया! पुढे एक शब्दही नाही. बास झाले आता!” मिहीर जोरात ओरडला. “तुझे आज थिएटरमधील लगट करण्याचा प्रयत्न आणि चावी नसण्याच्या बहाण्याने माझ्या घरी येणेच मला फार खटकले होते. म्हणून झोपताना मी माझ्या फोनचा कॅमेरा ऑन करून तिथे कोपऱ्यात ठेवून दिला होता. त्यात तुझे सगळे वागणे रेकॉर्ड झाले असेल.” असे म्हणत ड्रॉईंग रूमच्या शो केसच्या कोपऱ्यातून फोन काढून मिहीरने शनायाला तिची सगळी रेकॉर्डिंग दाखवली.
शनाया ती रेकॉर्डिंग पाहून खूप खजील झाली. आणि पटकन आपला स्टान्झ बदलून काकुळतीला येऊन म्हणाली,”नाही मिहीर प्लीज माझ्यासोबत असे करू नकोस. माझे तुझ्यावर फार प्रेम आहे. इतक्या वर्षांनी तुला पहिले आणि माझ्या भावना उचंबळून आल्या. मला माझ्या पतीकडून खूप अपेक्षा होत्या. मला वाटले होते कि तो मला राणीसारखे ठेवेल. पण माझा भ्रमनिरास झाला. पण आता तुझ्याकडून माझ्या फार अपेक्षा आहेत. प्लीज मला तुझी होउदे.” असे म्हणत तिने मिहीरला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला.
“चालती हो इथून आधी. मी आता परत तुझ्या जाळ्यात फसणार नाही. आणि हो! त्यादिवशीचे तू माझ्याकडून घेतलेले साड्यांचे २५ हजार आणि नेकलेसचे दीड लाख लाख, असे एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार एका महिन्याच्या आत माझ्या अकाउंट मध्ये ट्रान्स्फर कर, नाहीतर त्याची बिलं आणि हा विडिओ अपूर्वकडे जाईल.”
असे म्हणत मिहीरने शनायाला त्याच्या घरातून बाहेर काढले आणि दरवाजा बंद केला. मिहीरने आपल्या संयमाने आणि बुद्धीचातुर्याने स्वतःला तर वाचवलेच पण शनायालाही दिशाहीन होऊ दिले नाही.
समाप्त