माझे नाव प्रीती आहे. मला आर्या नावाची १४ वर्षांची मुलगी आहे. मी एक सिंगल मदर आहे. सिंगल मदर असल्याने मला मला अनेक जबाबदाऱ्या एकटीने पार पाडायच्या आहेत. सुरुवातीला मला सगळं जमवणं कठीण गेलं. आजूबाजूची लोक. त्यांच्या नजरा, टोमणे हे सगळं मला सहन करण्याच्या पलीकडे होतं; पण आर्याकडे बघून मी सगळं निमूटपणे सहन करत केलं. आर्यासुद्धा खूप लाघवी आहे, समजूतदार आहे.
ती आता नववीत आहे. ती दिवसभर शाळेत असते आणि संध्याकाळी सहा वाजता परत येते. तर मी माझे स्वतःचे छोटेसे पार्लर चालवते. आर्या आणि माझे एक छोटेसे जग आहे. स्वामीकृपेने आम्हा दोघांचे आयुष्य सुरळीत चालले आहे. पण आमच्या आयुष्यातील एक खूप मोठी गोष्ट मी आर्यापासून लपवून ठेवली आहे.
आम्हाला एकमेकांशिवाय अजून कुणाच्याही आधाराची गरज नव्हती. पण त्या दिवसानंतर कदाचित नियतीच्या मनात काहीतरी दुसरेच होते. एके रविवारी मी पार्लरचे सामान आणायला गेले होते. आर्या घरीच होती पण तिला अभ्यास असल्यामुळे ती काही माझ्यासोबत आली नव्हती.
सामान घेऊन झाल्यावर कॅब साठी उभी असताना अचानक संजय माझ्या समोर आला. ‘हाय’… त्याला पाहताच काही सेकंद मला कळलंच नाही काय बोलावं. नंतर मी स्वतःला जरा सावरून त्याला हाय केलं. मग त्याने पण चेहऱ्यावर उसनं हसू आणून मला हाय केलं.
ही कथा ( Marathi Story) आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.
“कसा आहेस?” मी त्याला विचारलं. माझ्या आवाजावरून मला बसलेला आश्चर्याचा धक्का आणि मनातली हुरहुर स्पष्टपणे कळत होती. पण तरी मी माझ्या भावनांना आणि चेहऱ्यावरील भाव आवरते घेतले.
संजय माझ्या भूतकाळातील बॉयफ्रेंड होता. त्याचं आणि माझं ब्रेकऑफ तब्बल १४ वर्षांपूर्वी झालं होतं. अगदी तरूणवयातलं आमचं प्रेम होतं. ना जास्त अवखळ, ना जास्त सामंजस्यपूर्ण अशा वयात आम्ही एकमेंकाच्या प्रेमात पडलो होतो. एका कॉमन मित्रामुळे आमची ओळख झाली होती. एका नजरेत आम्ही एकमेकांना पसंत पडलो. दोघांनाही एकमेकांप्रती असं काहीतरी होतं, ज्यामुळे एक कनेक्शन पहिल्याच भेटीत जाणवलं होतं.
आमचं बाँडिग खूपच छान होतं. आमच्या प्रेमाला एक वर्ष झाले आणि संजय ने मला प्रपोज केले. मीही आनंदाने ‘हो’ म्हटले.पण नंतर आयुष्यात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे आमचे प्रेम अपूर्णच राहिले. “कॉफी घेणार?” संजयच्या प्रश्नामुळे मी भूतकाळाच्या आठवणींच्या गर्दीतून भानावर आले. “हो चालेल.” मी म्हणाले. मग आम्ही जवळच्याच एका रेस्टॉरंट मध्ये गेलो. एकमेकांना बघून आम्ही दोघेही पूर्णपणे गप्प झालो होतो. इतक्या वर्षांनी भेटलो पण बोलायला काहीच नव्हतं.
संजयशी मला लग्न करायचे होते. आम्हा दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, पण आमच्या नशिबामुळे आम्ही एकत्र राहू शकलो नाही. संजय या शहरात आला होता. तो म्हणाला,”कुठे होतीस इतकी वर्ष? मी तुला खूप शोधले. तुला संपर्क करायचा खूप प्रयत्न केला, पण तू तूझा नंबर वारंवार बदलत राहिलीस.” “संपर्कात राहून तरी काय असे साधले असते रे आपण? आपण एकमेकांपासून दूर आहोत तेच बरे आहे.” संजय काही म्हणाला नाही. पण त्याला फार वाईट वाटत होते.
तो अजूनही माझ्यावर प्रेम करतो. हे मी त्याच्या डोळ्यात पाहू शकत होतो. मी त्याला विचारले,”लग्न केले की नाही?” त्याने नकारार्थी मान डोलावली. बराच वेळ शांत राहिल्यावर तो म्हणाला,” प्रीती, मला अजूनही तुझ्याशी लग्न करायचे आहे. आर्याला दत्तक घेऊन तिला माझे नाव द्यायचे आहे. पण मी त्याला काहीच उत्तर दिले नाही. आता इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये असे मला वाटत होते.
मी काही बोलत नाही असे पाहून संजय ने विचारले,”प्रीती तुझा फोन नंबर देशील? तुला माझ्याशी लग्न करायचे नसेल तर नको करुस. मी आग्रह करणार नाही. तू माझी झाली नाहीस म्हणून काय झाले? तूझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार तरी मला आहे आणि मी नेहमी तुझ्यावरच प्रेम करत राहील.” त्याचे हे बोलणे ऐकून माझे डोळे पाण्याने डबडबले.
कसाबसा त्याला माझा नंबर देऊन मी तेथून तडक निघाले. आज नशिबाने का बरे आम्हाला परत भेटवले? आयुष्यातील जे चॅप्टर मी कायमचे क्लोज केले होते, ते अचानक माझ्यासमोर का उघडले गेले? मला कल्पनाही नव्हती की तो असा माझ्या आयुष्यात परत येईल. संजयने दुसऱ्या दिवशी मला फोन केला. हळूहळू आमचे फोनवर बोलणे सुरु झाले. आर्याला मी अद्याप संजयबद्दल काही सांगितले नव्हते. मग एके दिवशी मला ज्याची भीती वाटत होती तेच नेमकी घडले.
एकदा माझी तब्येत बिघडली होती. संजयला हे समजताच नको नको म्हणत असतानाही मला बघायला तो तडक माझ्या घरी आला. नशिबाने आर्या शाळेत गेली होती. आर्याने त्याला बघावे असे मला वाटत नव्हते. त्या दिवशी आर्याची मंथ एन्ड असल्याकारणाने अर्धाच दिवस शाळा होती. मी नेमकेच हे विसरले. संजय आणि मी आमच्या जुने दिवस आठवून बोलण्यात हरवून गेलो होतो. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसले होते. त्याने माझा हात धरला होता.
अचानक आर्या “मम्माsss!” करत आत आली आणि आम्हाला असे पाहून आश्चर्यचकित होऊन अचानक गप्प झाली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. संजय काही न बोलता झटकन तिथून निघून गेला. आर्या आता काय विचार करत होती ते मला माहीत होतं. नेहमी आनंदी आणि मस्ती करणारी माझी मुलगी आज गप्प होती. तिला जाऊन समजावण्याची हिम्मतही माझ्यात नव्हती. मला प्रचंड अपराध्यासारखे वाटत होते.
आजपर्यंत मी तिला माझ्या भूतकाळाबद्दल काहीही सांगितलेले नाही. संध्याकाळी आर्या स्वतःहून माझ्याकडे आली आणि मला म्हणाली,” मम्मा, ते काका कोण होते? तुला माझ्याशी शेअर करायचे असेल तर तू करू शकतेस. पण जर तू कम्फर्टेबल नसशील तर नको सांगुस. पण मला तुला इतकेच सांगायचे आहे की तुला जर त्या काकांशी लग्न करायचे असेल तर तू करू शकतेस. मला काही प्रॉब्लेम नाही.” किती गुणाचं होतं माझं लेकरू!!!
तितक्यात दारावरची बेल वाजली. संजय परत आला होता. त्याला बघून आर्याने ‘हाय’ केले आणि शांतपणे आत निघून गेली. यावेळी परत संजयला पाहून मी विचारले, “तू पुन्हा का आलास?” यावर संजय म्हणाला, “माझ्या चुकीमुळे तुझ्या मुलीने गैरसमज करून घ्यावा असे मला वाटत नाही. आर्याला तू सगळे सांगितले का?” “नाही! अजून काही नाही.” मी म्हणाले.”पण मला वाटते आर्याला आता सत्य सांगायची वेळ आली आहे. अजून असे किती दिवस तू सॅक्रिफाईस करणार आहेस?”
“कसले सॅक्रिफाईस मम्मा?” आर्या संजयची पाणी घेऊन बाहेर येत होती. आपसूकच आमचे बोलणे तिच्या कानावर पडले. “तुझी मम्मा तुला काही सांगणार नाही.पण मीच सांगतो.” संजयने पुढाकार घेऊन तो बोलू लागला,”आर्या, तू प्रीतीची खरी मुलगी नसून तिच्या भावाची मुलगी आहेस.” आर्या अवाक होऊन आळीपाळीने संजय आणि माझ्याकडे बघतच बसली.
“बेटा, तुझे खरे आईबाबा प्रीतीचे दादा आणि वाहिनी होते. तू सहा महिन्यांची असताना एका कार ऍक्सिडंटमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तुझ्या आजी-आजोबांचे आधीच निधन झाले होते. मग तुला कोण सांभाळणार हा प्रश्न प्रीतीपुढे होता.तिने त्या दिवशी तुला जे छातीशी धरले ते आजपर्यंत! आम्हा दोघांचे त्यावेळी लग्न ठरले होते आणि आम्ही दोघेही तुला एकत्र मोठे करणार होतो.
पण माझ्या आई-बाबांनी तुला अनाथाश्रमात ठेवण्याचा सल्ला दिला. तुला अनाथाश्रमात ठेवणं प्रीतीला अजिबात मान्य नव्हतं. तिच्या या निर्णयाचा माझ्या घरच्यांनी विरोध केला. पण प्रीती आपल्या मतावर ठाम होती. माझ्या आई-वडिलांनी हे लग्न मोडलं. आम्ही दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो, पण नियती समोर दोघेही लाचार होतो. मी माझ्या आई-बाबांसमोर हतबल होतो. त्यांना खूप घाबरत होतो. पण ती माझ्या आयुष्यातील फार मोठी चूक होती.
त्या चुकीचे प्रायश्चित्त करण्यासाठी मी स्वतःही लग्न केले नाही. पण उशीर झाला होता. प्रितीने तिचे घर, जमीन विकून ती दुसऱ्या शहरात शिफ्ट झाली. तिचा फोन नंबर चेंज केला. तिने स्वतःही लग्न केले नाही, तुझ्या प्रेमात कुणी वाटेकरू येऊ नये म्हणून. आता आम्ही इतक्या वर्षांनी भेटलो तेव्हा मी तिला खूप समजावलं, पण प्रीतीला तुझ्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. प्रीती तुझी मम्मा नाही तर आत्या आहे.”
आर्या डोळे विस्फारून ऐकत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. हे सारे ऐकून आर्या धावत माझ्याकडे आली आणि मला बिलगून रडू लागली. रडत रडत ती बोलू लागली. “मी काय बोलू तुला? मम्मा, आत्या की देव?” मी म्हणाले,”तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझी आई आहे, हेच सत्य आहे आणि तेच कायम राहील.” आर्याने विचारले,”मम्मा, तू माझ्यासाठी स्वतःच आयुष्य का बरबाद केलेस?”
“काय चुकलं माझं बेटा? एकटीने मुलीचा सांभाळ करणं चुकीचं आहे का? आपला समाज अजून एवढा मागासलेला आहे की, दुसऱ्याच्या पोराला स्वतःच म्हणून उराशीही लावू नये. एवढ्या पुढारलेल्या जगात, माणुसकी, प्रेम याला काहीच किंमत नाही. मी फक्त तूला चांगलं आयुष्य कसं देता येईल याचा विचार केला. आता तूच माझं विश्व आहेस.” मी आता भावनिक झाले होते.
यावर आर्या बोलली,” मम्मा, आता तुझंही लग्न होईल, तेही मोठ्या थाटामाटात, तुला हवं तेव्हा आणि हवं तसं – संजयकाकांसोबत.” “काका नाही! डॅडी! प्रीती जर तुझी मम्मा असेल तर मी तुझा डॅडी आहे.” संजय हसत म्हणाला. “माझी भाची नाहीयेस तू! माझा जीव आहेस.” असं म्हणत मी आर्याला मिठी मारली आणि संजयने आम्हा दोघींनाही आपल्या कवेत घेतले. माझी १४ वर्षांची तपश्चर्या आता सफल झाली होती.
समाप्त