दोघात तिसरा? | मराठी कथा संग्रह | मराठी story

Extramarital Affairs & Its Effect During Divorce | Griffiths Law

माझं नाव ईश्वरी आहे. मी खूप आनंदी आणि हॅपी गो लकी पर्सन आहे. मी माझ्या आईबाबांची फार लड़की मुलगी आहे. माझ्या आईबाबांनी मला फार मोकळ्या वातावरणात लहानाचे मोठे केले.

कधीच कुठची गोष्ट करण्यासाठी अडवले नाही. मी पण कधी आईबाबांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला नाही. माझ्या मोकळ्या स्वभावामुळे माझे बरेच मित्रमैत्रिणी होते, त्यातही मुली कमी आणि मुले जास्त. माझ्या आईला नेहमी माझी काळजी वाटायची की उद्या मी सासरी गेले तर माझे काय होईल? माझ्या मोकळ्या स्वभावाबद्दल सासरची माणसे काय म्हणतील?

पण बाबा नेहमी म्हणायचे की जे होईल ते चांगलेच होईल, देवाने आपल्या इशुच्या नशिबात काहीतरी चांगलेच लिहिले असेल. मी वयात आल्याबरोबर आईबाबांनी माझ्यासाठी जीवनसाथी शोधायला सुरुवात केली. पण अनेकजणांनी माझा मोकळाढाकळा स्वभाव बघून मला नकार दिला. ‘मुलगी खूपच  बोलते’ म्हणून अनेकांनी आम्हाला तोंडावर सांगितले.

आता मला सांगा, हे काही कुणाला नकार देण्याचे कारण आहे का? पण या सगळ्या गोष्टींनी मला काही फरक पडत नाही. मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. मस्तमौला म्हटले तरी चालेल. पण आता आईबाबांना माझ्या लग्नाची जरा काळजी वाटू लागली होती.

एका रविवारी मला बघायला अजून एक मुलगा येणार होता. यावेळी मात्र माझ्या आईने मला आधीच बजावले होते की मी माझ्या हसण्यावर आणि बोलण्यावर जरा नियंत्रण ठेवावे. रविवारी

नीरज आणि त्याचे आईबाबा मला बघायला आले. मी आईने सांगितल्याप्रमाणे मोजूनमापूनच बोलत होते, जोराने न हसता फक्त हलकीशी स्माईल देत होते. चहा-नाश्ता झाल्यावर आम्हा दोघांच्या आईबाबांनी फक्त दोघांनाच बोलायला गच्चीवर पाठवले.

मी बराच वेळ स्वतःला रोखून धरले होते. पण गच्चीवर जाताच मात्र मी नीरजशी भडाभडा बोलू लागले. नीरज मला आवडला होता आणि मला त्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायचे होते.

ही मराठी कथा (मराठी कथा संग्रह) आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.

मी बोलू लागले आणि त्याला माझ्या मनातलं सगळं विचारलं, तुझा जॉब प्रोफाईल काय, तू किती कमावतोस, तुला मित्रमैत्रिणी किती, तुझे छंद काय काय आहेत, तुला प्रवासाची आवड आहे की नाही. नीरज हा फार शांत मुलगा होता. मला वाटले की कदाचित माझा स्वभाव बघून नीरज मला नाकारेल. पण नीरजला माझा स्वभाव आणि बडबड आवडली.

घरच्यांनी आमचे लग्न लावून दिलं. नीरज बंगलोरला राहतो, त्याला तिथे चांगली नोकरी आहे. त्यामुळे लग्नानंतर मी बंगलोरला शिफ्ट झाले. नीरज सकाळी 8 च्या आधी ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी 6 वाजता परत यायचा. हळूहळू लग्नानंतरचे आमचे रुटीन चालू झाले. एक दिवस ऑफिसमधले त्याचे सगळे मित्र जेवायला आमच्या घरी आले.

पहिल्यांदाच सगळे मला भेटत होते. मी तशी स्वयंपाकात एक्स्पर्ट आहे. सगळेजण माझ्या हातचे जेवण जेवून फार खुश झाले. मी सगळ्यांशी फार मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यात नीरजचा रवी नावाचा एक मित्र होता.

तो पूर्वी नीरजच्या ऑफिसमध्ये काम करायचा, पण नंतर त्याने जॉब सोडून मॉडेलिंग सुरु केले. तो मला बोलला की त्याला माझ्याकडून स्वयंपाक शिकायचा होता. मी पण म्हणाले,” ये केव्हाही, मी दिवसभर फ्री आहे.” सगळे पाहुणे रात्री निघून गेले.

रात्री आवराआवर करून झोपायला खूप उशीर झाला आणि कामाच्या नादात मी नीरजला रवीबद्दलची गोष्ट सांगायला विसरले. दुसऱ्या दिवशी नीरज सकाळी लवकर ऑफिसला गेला आणि थोड्यावेळाने रवी स्वयंपाक शिकायला आला. मी त्याला थोडं शिकवलं. दुपारी तो परत गेला, पण जाताना त्याची कॅप आमच्या सोफ्यावरच विसरून गेला.

नीरज संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर त्याने सोफ्यावर ती कॅप पाहिली आणि मला विचारले की कोण आले होते? मी म्हणाले,”अरे हो! काल मी तुला सांगायचेच विसरले. रवीला माझ्याकडून स्वयंपाक शिकायचं होता. तो आला होता आज सकाळी. त्याचीच आहे ही कॅप.”

नीरजच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी आली. तो म्हणाला,”अरे आला होता तर मला भेटून जायचे ना?” मी म्हणाले,”बरे! मी सांगते उद्या त्याला थांबायला.” दुसऱ्या दिवशी रवी दुपारनंतर स्वयंपाक शिकायला आला. त्याला शिकवून झाल्यावर तो जायला निघाला.

पण मी त्याला म्हटले,”रवी थांब ना. नीरज येईलच इतक्यात.” तो थांबला. थोड्यावेळाने नीरज आला आणि त्याच्याशी थोड्याफार गप्पा मारून रवी निघून गेला. तो गेल्यावर नीरज शॉवर घेऊन फ्रेश झाला आणि माझ्या सवयीप्रमाणे मी त्याला दिवसभराच्या गोष्टी बडबड करत सांगत होतो.

अचानक तो माझ्यावर जोरात ओरडला आणि म्हणाला,”गप्प बैस जरा. किती बडबड करतेस तू? दिवसभराच्या थकव्यानंतर ऑफिसमधून घरी यावे तर इथेही शांती नाही.” मी एकदम दचकलेच. आजपर्यंत नीरज माझ्यावर कधीही एवढा रागावला नव्हता. आज अचानक काय झाले?

मी एकदम शांत झाले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्याला एवढा राग कशामुळे आला हे मला समजले नाही. आमचे दोघांचे बोलणे बंद झाले. दुस-या दिवशी पण नीरज माझ्याशी काही न बोलता ऑफिसला गेला.

रवी दुपारनंतर येणार होता. माझ्याकडे खूप वेळ होता म्हणून मी आईला फोन केला आणि तिला सर्व हकीकत सांगितली. तिला विचारले,”आई, अशी काय चूक झाली गं माझ्याकडून की नेहमी शांत असणारा नीरजही माझ्यावर चिडला?”

हे सारे ऐकून आई माझ्यावरच भडकली. म्हणाली,”बावळट मुलगी! तुला रवीला घरी बोलवण्याची काय गरज होती?”  मला काही समजलेच नाही. मी म्हणाले,”अगं आई तो नीरजचा मित्र आहे. एकटाच बंगलोर मध्ये राहतो.

मी जेवण चांगले बनवते म्हणून त्याला माझ्याकडून स्वयंपाक शिकायचा होता. बस इतकेच.” यावर आई म्हणाली, “बेटा, तुझ्या आणि नीरजच्या लग्नाला फक्त एक महिनाच झाला आहे. तुम्ही दोघे एकमेकांना अजूनही पूर्णपणे ओळखत नाही आहेत. आणि तो तुझा नवरा आहे, जर तू दुसऱ्या कुणा पुरुषाशी इतके फ्रँकली वागशील तर तो नक्कीच जेलस होईल.”

आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. नीरजचा  मूड का खराब होता हे मला समजले. दुपारनंतर रवी घरी आला. आल्यावर त्याने मला सांगितले की त्याला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला होता आणि त्यामुळे तो २-३ महिने पॅरिसला जाणार होता. आज मी मुद्दाम रवीला नीरज घरी येईपर्यंत थांबवून ठेवले होते.

संध्याकाळी नीरज घरी आला. रवीला पुन्हा घरी पाहताच त्याचा चेहरा पडला. मी नीरजला म्हणाले, “नीरज, आज मला खूप आनंद झाला आहे, रवीला नवीन  प्रोजेक्ट मिळाला आहे आणि त्यासाठी तो पॅरिसला  जाणार आहे.” नीरज काही न बोलता गप्पपणे उभाच होता.

मी रवीकडे वळून म्हणाले,”रवी मजा आहे बाबा तुझी. आता तू फार फेमस होशील. पण जरी तू फेमस झालास तरी तुझ्या या बहिणीला विसरू नकोस.” रवी म्हणाला, “अजिबात नाही विसरणार. तुझ्याचमुळे गेले ४ दिवस माझे पोट ठीक आहे, नाहीतर बाहेरचे फूड खाऊन खाऊन मला इन्फेक्शन झाले होते. आता कुठेही गेलो तरी तू शिकवलेल्या रेसिपीज बनवून मी माझे खाण्यापिण्याचे निभावून नेऊ शकतो. थँक यु इशू ताई.”

आमचे संभाषण ऐकून नीरजचा चेहरा आता बदलला होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. थोडयावेळ निरजशी गप्पा मारून रवी निघून गेला. तो गेल्यावर मी काही न बोलता आत किचनमध्ये निघून गेले. नीरजचा संशय आता दूर झाला होता. तोही माझ्यामागे किचनमध्ये आला आणि म्हणाला,”इशू, सॉरी. काल मी उगीच तुझ्यावर रागावलो.”

मी त्याला विचारले,”काल काय झाले होते की तू माझ्यावर इतका रागावला होतास? खरे सांग.” तो म्हणाला, “ऑफिसमध्ये खूप काम होतं. म्हणून जरा कामाचे टेन्शन होते.”  मी म्हणाले,”नीरज, मला माहित आहे की तू माझ्यावर का रागावला होतास ते. तुझ्या जागी मी असते तर कदाचित तुझ्यासारखाच विचार केला असता. पती-पत्नीमधील नाते हे विश्वासाचे आणि प्रेमाचे असते. जर दोघांपैकी एकालाही कुठला गैरसमज झाला असेल दुसऱ्याला न बोलता कसे कळणार? पण आपण एकमेकांना समजून घेऊन आणि संवादाने सगळे प्रॉब्लेम्स सोडवू शकतो.”

त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू आणि नजरेत माझ्यासाठी कौतुक होतं. तो म्हणाला,”मला माफ कर इशू. चूक झाली माझी. पुन्हा असे होणार नाही.” आणि असे म्हणून त्याने मला जवळ घेतले.

खरे आहे मित्रांनो, पती-पत्नीमधील संबंध कमकुवत होण्यामागे गैरसमज हे प्रमुख कारण आहे. बोला, फक्त आपल्या पार्टनरशी बोलल्याने आणि सामंजस्यानेच  तुमच्यातील गैरसमज दूर होऊन तुमचे नाते अजून घट्ट होईल.

समाप्त

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top