मर्जीविरुद्धचे लग्न | मराठी कथाकथन | Marathi Story

Free Beach Couple photo and picture
मराठी कथाकथन

माझे नाव जिया आहे. माझ्या वडिलांनी माझ्यासोबत असा डाव खेळाला की ज्याची मी कधी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. मग आहे ती परिस्थिती आणि माझे वास्तव स्वीकारणे मला फार जड गेले.

आम्ही अतिशय श्रीमंत कुटुंबातील आहोत. डॅडींचा इम्पोर्ट एक्स्पोर्ट चा बिजनेस आहे. आमच्या घरी खूप नोकर आणि गाड्या आहेत. पण मी तीन वर्षांची असताना माझी मम्मा वारली. माझ्या डॅडींनी मला अतिशय लाडाकोडात वाढवले. मम्माची कमतरता जाणवू नये म्हणून मला काही कमी पडू दिले नाही. पण ह्याचा परिणाम असा झाला की मी अतिलाडाने बिघडले.

लहानपणापासून मला चैनीची सवय होती. मोठी झाल्यावर मला कॉलेजमधील फ्रेंड्सच्या संगतीने दारूचे व्यसन लागले. रोज पब्स, पार्ट्या, दारू आणि मौजमजा ह्यातच मी माझे आयुष्य मजेत जगात होते. पण त्या एका दिवसाने माझे आयुष्य बदलले.

महिन्याभरापूर्वी आमच्या घरी एक नवीन ड्रायव्हर जॉईन झाला होता. त्याचे नाव अमर होते. अमर यंग होता, स्मार्ट होता, ड्रायविंग छान करायचा, पण फारच आगाऊ होता. तो खूप प्रश्न विचारायचा. तूम्ही कुठे चालला आहेत? कशाला चालला आहात? कोण आहेत तुमच्यासोबत इ. मला हे प्रश्न अजिबातच आवडायचे नाही.

एकदा तर हद्दच झाली. मी आणि माझे फ्रेंड्सनी एकदा लोणावळ्याला रेव्ह पार्टीला जायचा बेत आखला होता. त्यासाठी सगळे फ्रेंड्स माझ्या घरी आले आणि आम्ही निघालो. अमर ड्राईव्ह करत होता. आमच्या फ्रेंड्सची गाडीत पार्टी बद्दलची चर्चा चालू झाली. अमरला आम्ही कशासाठी लोणावळ्याला चाललो आहोत ते लक्षात आले आणि त्याने माझ्या फ्रेंड्सला रस्त्यातच उतरवले आणि कार  जबरदस्तीने घरी परत घेऊन आला.

मला त्याचा प्रचंड राग आला होता. मी म्हटले,”अमर, तू समजतोस कोण स्वतःला? ड्राइवर आहेस. ड्रायव्हरच्या मर्यादेत राहा.” यावर तो म्हणाला,”मॅडम, मी तुम्हाला अशा घाणेरड्या पार्टीला जाऊ देणार नाही. तुमची मित्रमंडळींची संगत देखील चांगली नाही. ते तुम्हाला बिघडवतायत. असल्या लोकांसोबत जाऊन तुमच्या आयुष्याची राखरांगोळी होईल.” “हे मला सांगणारा तू कोण? चालता हो इथून. मला तू नजरेसमोर देखील नकोस. मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढले आहे.” मी आता खूप भडकून तारस्वरात त्याच्यावर ओरडले. अमर ताडकन निघून गेला.

मला वाटले,’हा साधा ड्राइवर असूनदेखील ह्याला इतका माज आणि ऍटिट्यूड? बरे झाले त्याला कामावरून काढून टाकले ते.’  हे डॅडींना सांगण्याची गरज वाटली नाही कारण आमच्याकडे ड्रायव्हर्सची  कमतरता नव्हती.

मी तडक माझ्या फ्रेंड्सना फोन केला आणि रात्री आम्ही सगळे पबला गेलो. त्यारात्री मी नेहमीपेक्षा खूप जास्त दारू प्यायले होते. पण त्यानंतर माझ्यासोबत असं काही घडेल ह्याची मी कधी कल्पनाच केली नव्हती.

दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली आणि पहिले तर तो ड्रायव्हर अमर माझ्या खोलीत होता. एवढ्या सुरक्षेत तो ड्रायव्हर माझ्या खोलीत कसा आला ते मला कळलेच नाही. नंतर माझ्या लक्षात आले की मी माझ्या बेडरूममध्ये नव्हे तर कुठेतरी दुसरीकडेच होते. मी घाबरले.

मला वाटले की काळ मी त्याला नोकरीवरून काढून टाकले त्याचा बदला त्याला घ्यायचा असेल म्हणून त्याने मला किडनॅप करून आणले असेल. मी घाबरून म्हणाले,”तू इथे काय करतो आहेस.?” यावर तो म्हणाला, मी तुझा नवरा आहे, काल रात्री तुझे आणि माझे लग्न झाले आहे.” “व्हॉट रबिश?” काय वेडबिड लागलाय की काय तुला? की गांजा फुंकून आला आहेस? तू आणि माझा नवरा? हा जन्मी तरी शक्य नाही? कुठे आणलं आहेस तू मला किडनॅप करून? माझी पर्स कुठे आहे? माझा मोबाईल आणि माझे क्रेडिट कार्ड्स कुठे आहेत? माझ्या डॅडींना माहित पडले तर वाट लावतील तुझी!!” मी वैतागून म्हटले.

हे मराठी कथाकथन आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.

“तुझे डॅडी आणि माझी वाट लावतील? त्यांनीच तर काल रात्री माझे तुझ्याशी लग्न लावून दिले. आणि हो! तुझी पर्स ज्यात तुझा मोबाईल आणि क्रेडिट कार्ड्स होते, ती मी तुझ्या डॅडींना परत दिली आहे.” “माझ्या डॅडींनी? इम्पॉसिबल!!” मी जोरात ओरडले. “अगं हो हो! जरा शांत हो!! मला वाटलेच होते की तू माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. हे बघ आपल्या लग्नाचे फोटो.” असे म्हणून त्याने त्याच्या मोबाईलमध्ये आमच्या लग्नाचे फोटो दाखवले.

फोटोज बघून मी वेडीच झाले. माझे आणि अमरचे खरंच लग्न झाले होते. आणि माझ्या डॅडींनी माझे कन्यादान करतानाचे पण फोटो होते. मात्र फोटोत मला भान नव्हते.  पण माझा विश्वास पण बसत नव्हता. माझ्या डॅडींचे माझ्यावर इतके प्रेम होते की त्यांनी माझ्या संमतीशिवाय आमच्या घरचे पान देखील हालत नव्हते. मग अशा माझ्या बेशुद्ध अवस्थेत त्यांनी माझे लग्न एका ड्रायव्हरशी माझे लग्न का लावून दिले? मी पूर्णपणे सुन्न झाले. मला काही सुचतच नव्हते.

पण तशाही अवस्थेत मी माझ्या डॅडींकडे गेले. त्यांना विचारले, “डॅडी, हे काय नाटक आहे? तुम्ही माझे लग्न या ड्रायव्हरशी का लावून दिले? आणि तेही मला बेशुद्ध करून? तुम्ही असं कसं करू शकता? की हा कुठला घाणेरडा प्रॅन्क आहे?”

डॅडी म्हणाले,”नाही बेटी, हा कुठलाच प्रॅन्क नाहीये. मला तुझे लग्न खरंच अमरशी लावून द्यावे लागले. पण ती माझी मजबुरी होती. मला तसे करण्यास भाग पाडले गेले.” मी विचारले,”कुणी भाग पाडले डॅडी? आणि असली कसली मजबुरी होती तुमची? आपण तर इतके पैसेवाले आहोत. मग तुम्हाला मॅनेज नाही का करता आले? काय झाले डॅडी? सांगा ना मला! इतकी कसली लाचारी आहे डॅडी जी तुम्ही पैशाने पण घालवू शकत नाही? आणि हा कोण टिनपाट ज्याच्याशी तुम्ही माझे लग्न लावले?” मी जोरजोरात रडू लागले.

डॅडी काहीच बोलले नाही. फक्त खिडकीतून बाहेर पाहत राहिले. अमर म्हणाला,”जिया, नीट बोल, आता मी तुझा नवरा आहे. घरी चल.” मी म्हणाले,”मला हे लग्न मान्य नाही, हे कसले लग्न आहे, जे माझ्या इच्छेविरुद्ध आहे. मी मुळीच येणार नाही तुझ्यासारख्या दीडदमडीच्या माणसाबरोबर.” अमर म्हणाला,”नाही जिया! आता तुझी मनमानी चालणार नाही. तू माझी बायको आहेस आणि आता तू माझ्यासोबत राहशील, तुला मान्य नसेल तर हे फोटोज मीडियात जातील.”

“नाही! मी अज्जीबात येणार नाही. डॅडी काहीतरी बोला ना.” डॅडी आतापर्यंत  माझे वडील शांतपणे आमचे संभाषण ऐकत होते. ते फक्त एव्हढेच बोलले,”जिया, आता अमर तुझा नवरा आहे. तू त्याच्याबरोबर जा.” अमरने माझा हात घट्ट पकडून ओढायचा प्रयत्न केला. एवढी सुरक्षा पण त्याला कोणी अडवत नव्हते. माझे वडीलही पुतळ्यासारखे झाले होते.

मी फार रडत होते आणि अमर माझा हात खेचून मला घेऊन जात होता. माझ्या डॅडींची काय मजबुरी होती हे मला माहीत नव्हते पण या सगळ्यात माझ्या आयुष्यासोबत एक मोठा जोक घडत होता. अमर मला त्याच्या घरी घेऊन गेला.

तो चाळीत राहात होता. ते घर नव्हते, अक्षरशः एक  पिंजरा होता, एक छोटीशी खोली होती. बाथरूमसाठीही खोलीबाहेर जावे लागले. त्याने मला सांगितले की आता हे तुझे आणि माझे घर आहे. एकाच खोलीत त्याचा सारा संसार होता. किचन,बेडरूम,हॉल सारे एकाच रूममध्ये. मी आयुष्यात इतके छोटे घर पहिले नव्हते. आमच्या सरवंटस क्वार्टरज पण ह्याच्यापेक्षा मोठ्या होत्या.

त्या चाळीत अनेक खोल्या होत्या आणि त्यातही लोक राहत होते. मला आयुष्यात कधी वाटले नव्हते की मी अशा ठिकाणी येईन. मी असहायपणे बसूनच राहिले. अमर म्हणाल, फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या आहेत आणि किचनच्या ओट्याखाली स्वयंपाकाचे सगळे सामान. भूल लागेल तेव्हा तुला पाहिजे असेल ते बनवून खा. ने त्याच्याकडे बघताच बसले.

नोकरीवरून काढून टाकल्याचा बदल अमर असा घेईल असे मला कधीच वाटले नव्हते. मी म्हणाले,”मला स्वयंपाक करायला येत नाही.” तो म्हणाला,”ठीक आहे, मी बाहेर कुठेतरी खाईन, मग तू उपाशी राहशील.” एवढे बोलून तो निघून गेला. मी पळून जाण्याचा विचार केला पण मग मी विचार केला कुठे जाऊ, मी माझ्या घरी तर जाऊ शकत नाही, मी रडतच राहिले.

दिवसभर मी रडत होते. सन्ध्याकाळ झाली, मला भूक लागली होती. खूप भूक! अशी भूक मला आयुष्यात कधीच लागली नव्हती. मी आमच्या खोलीच्या उंबऱ्यावर बसून रडत होते. जवळच्या खोलीतील एक स्त्री मला रडताना पासून माझ्याकडे आली. तिने मला विचारले,”काय झालं पोरी? का रडते आहेस?” मी तिला म्हणाले की मला भूक लागली आहे. हे ऐकताच तिने मला तिच्या खोलीतून भाजी-चपाती आणून दिली, मी ती खाल्ली.

आजपर्यंत मी सर्व प्रकारचे पदार्थ खाल्ले होते. पण ती भाजी-चपाती खाल्ल्यावर मला जो अनुभव आला तो शब्दांपलीकडचा होता. मला अक्षरशः देव सापडल्याचा भास झाला. माझा भुकेने तळमळणारा जीव आता शांत झाला होता.

अमर परत आला तेव्हा रात्र झाली होती. येताच त्याने खोलीचा दरवाजा बंद केला. मला भीती वाटत होती की तो माझ्यावर जबरदस्ती करेल. पण तो एका कोपऱ्यात शांतपणे झोपला. काय माझे नशीब होते?

एका दिवसात मी एवढ्या मोठ्या बंगल्यातून एका खोलीत आले होते. तेही एका अनोळखी व्यक्तीसोबत. मला वाटलं आता हे सगळं मला सहन होणार नाही. रात्रभर झोप लागली नाही.

अचानक रात्री मला माझ्या फ्रेंड्सची आठवण आली. डॅडींच्या घरी जाऊ शकत नाही, पण फ्रेंड्सच्या घरी तरी जाऊ शकते ना? सकाळी अमर उठण्यापूर्वी मी त्याच्या खोलीतून पळत सुटले आणि माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले. पण जेव्हा मी तिच्या घरी तेव्हा तिने मला तिच्या घरात घेतले नाही.

ती म्हणाली,”जिया तुझ्या डॅडींचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की आता तुझे लग्न झाले आहे. आणि जिया जर तुझ्या घरी आली तर तिला घरात घेऊन नकोस. तिला कुणी मदत केली तर त्याचा परिणाम चांगला नाही होणार म्हणून. त्यांनी आपल्या सगळ्या फ्रेंड्स ना फोन करून हेच सांगितले आहे. जिया, सॉरी. तू तुझ्या नवऱ्याच्या घरी परत जा.” असे म्हणून तिने दरवाजा बंद केला.

बाकीच्या फ्रेंड्सकडे जाऊनही काही फायदा नव्हता. सगळ्यांनाच डॅडींनी फोन केला होता. मी दिवसभर इकडे तिकडे भटकत राहिले. रात्र होऊ लागली. आता मी काय करू? कुठे जाऊ? मी नाईलाजाने परत अमरच्या घरी गेले.  मला वाटले होते की मी अमरच्या त्या खोलीत परत जाणार नाही.

पण काही तासातच मला समजले की सध्या माझ्यासाठी यापेक्षा सुरक्षित जागा नाही. मला परत आलेले पाहताच तो हसून म्हणाला,”मला माहीतच होते की तू परत येशील.” मी काहीही न बोलता आत गेले. मला फार भूक लागली होती. मला अमरने जेवण वाढले, मी काही न बोलता चुपचाप जेवले. जेवण साधेच होते पण चविष्ट होते. साधे जेवण पण इतके छान लागू शकते हे मला कालपासून कळत होते.

मी अमरला म्हणाले,”मला नवीन मोबाईल हवा आहे.” तो म्हणाला,”थांब थोडे दिवस. माझ्याकडे पैसे नाहीत. तू तर मला आधीच नोकरीवरून काढले आहे. आता सध्या मी नवीन नोकरीच्या शोधात आहे. ती मिळाली की घेईन तुला मोबाईल. सध्या नोकरी नसताना घरात खायला मिळते आहे तेच आपले नशीब आहे.” मी गप्प बसले.

मला याआधी इतकं असहाय्य कधीच वाटलं नव्हतं. असेच थोडे दिवस गेले. आता मला तिथे राहून 10 दिवस झाले होते आणि दहा दिवसात मी फक्त चहा आणि खिचडी बनवायला शिकले होते. मला अद्याप स्वयंपाक येत नव्हता. दिवसभरात मी फक्त तेच बनवून खाऊ शकत होते.

मग एके दिवशी तिला चक्कर आली आणि मी खाली पडले. आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी माझ्या डॅडींच्या घरी होते. माझे डॅडी माझ्या समोर होते. त्यांना समोर पाहताच मला फार राग आला. मी अमरला म्हणाले  कि तू मला इथे का आणलेस? मला तिथे का मरू दिले नाहीस?

अमर शांतच होता. डॅडी म्हणाले, “बेटा, मला माफ कर. पैशाच्या धुंदीत तू वाहवत गेली होतीस. रोज पब्ज, पार्ट्या, दारू, बॉयफ्रेंड्स. तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तू माझे ऐकले नाहीस. मला ते सहन होत नव्हते. म्हणून शेवटी मला ही पद्धत अवलंबावी लागली.” “पण का डॅडी?” मी आश्चर्याने विचारले.

डॅडी म्हणाले,”बाळा, अक्षरशः चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलीस. तू लहान असतानाच तुझी मम्मा देवाघरी गेली. आईविना पोर म्हणून मी तुला फार लाडात वाढवले, तुझा एक शब्दही खाली पडू दिला नाही. पण तू माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतलास. पैशाच्या माजाने फार गर्विष्ठ बनलीस. आपल्याकडे काम करणाऱ्या नोकर मंडळींना, ड्रायव्हर्स लोकांना माणूस नाही तर, कचरा समजू लागलीस. त्यांच्याशी उद्दामपणे वागायला लागलीस. मला न सांगता आजपर्यंत तू परस्पर कितीतरी लोकांना काढून टाकले आहेस. हे विश्व मी शून्यातून निर्माण केले आहे, पण तुला ते आयते मिळाले आहे. म्हणून तुला पैशाची, लोकांची कदर नाही.” मी अवाकपणे ऐकताच होते.

डॅडी पुढे म्हणाले, “तू इथे असताना सतत  दारूच्या प्रभावाखाली असायचीस. त्या दारूच्या नशेत तू किती लोकांना नोकरीवरून काढून टाकले आहे याची तुला कल्पना आहे का? नोकरी गेल्यावर त्यांचे, त्यांच्या कुटुंबाचे काय झाले असेल ह्याचा कधी विचार केलास का तू? नोकरी जाणे म्हणजे काय हे आता तुला ह्या १० दिवसात माहिती पडले असेल. कुटुंब कसे चालते याबद्दल कदाचित या १० दिवसांत तुला नक्कीच काहीतरी शिकायला मिळाले असेल.”

बोलता बोलता डॅडी थांबले. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. अमरने त्यांच्या खांदयावर हात ठेवला. डॅडी अमरकडे पाहत पुढे म्हणाले,”जिया हा अमर ड्रायव्हर नाही, माझा मित्र आणि व्यापारी मनोहर सोनटक्के यांचा एकुलता एक मुलगा. अमरने तुला आमच्या एका बिजनेस पार्टीत पाहिले होते, तेव्हापासून तो तुझ्या प्रेमात पडला होते. त्याला तुझ्याशी लग्न करायचं होतं. पण त्याने तुला आधी नीट परखायला हवं असं मीच त्याला म्हटलं होतं. म्हणून तो ड्राइवर बनून आपल्या घरी आला. तेव्हा त्याला समजले की तुम्ही मित्रमंडळींच्या नादाला लागून चुकीच्या मार्गावर जात आहेस. तुला समजावून पण काही फायदा नव्हता. तुझ्या डोळ्यावर पैशाची धुंदी होती. म्हणूनच आम्ही दोघांनी मिळून हे नाटक केलं. जेणेकरून तुझे डोळे उघडू शकतील. तुझं लग्न झालं त्या रात्री तू दारूच्या नशेत घरी आलीस. मग आम्हाला पुढचे नाटक करणे सोपे गेले.”

डॅडींचे बोलणे ऐकून मला फार धक्का बसला. ‘खरंच मी इतके दिवस किती वाईट वागत होते सगळ्यांशी? कधी लोकांच्या भावनेचा त्यांच्या मानसन्मानाचा मी विचारच नाही केला. अमर स्वतः इतका श्रीमंत असून माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी ड्राइवर बनला, वेळोवेळी मला प्रोटेक्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला. पण मी सतत त्याचा पाणउतारा केला, त्याला नकोनको ते बोलले.

दहा दिवस मी त्याच्यासोबत इतक्या छोट्याशा खोलीत होते. पण त्याने माझा कधीही गैरफायदा घेतला नाही. हे सारे नाटक मला धडा शिकवण्यासाठी होते. आणि या सर्व गोष्टींनी माझे डोळे उघडले होते.’ मी डॅडींना म्हणाले,’डॅडी, खरंय तुमचं! खरंच मी किती वाईट वागले सगळ्यांशी. मला माझ्या कृत्याचा पश्चाताप वाटतोय. मी उद्याच त्या सगळ्या लोकांना परत बोलवेन ज्यांना मी उद्दामपणे कामावरून काढून टाकले होते.” 

मी अमरकडे वळून म्हणाले,”अमर मला माफ कर. अजाणतेपणी मी सतत तुझा अपमान केला. पण आता मला फार वाईट वाटतेय माझ्या गर्विष्ठ वागणुकीबद्दल! मला माफ करशील? तुझे माझ्यावर अजूनही प्रेम असेल तर माझ्याशी लग्न करशील?” “लग्न? अगं ते तर १० दिवसांपूर्वीच झाले आहे. ह्या सर्व खोट्या नाटकात एक गोष्ट मात्र खरी होती आणि ते म्हणजे आपले लग्न. ते काही खोटे नव्हते. तू खरंच माझी बायको आहेस.” अमर मिश्किलीने डोळे मिचकावत बोलला. मी लाजले आणि मग आम्ही सर्वचजण मोठ्याने हसू लागलो. डॅडींच्या डोळ्यात मात्र आनंदाश्रू होते.

समाप्त

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top